पुणे, दि. १८ : पुणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईचा धडाका कायम ठेवत बडगावशेरी परिसरातील शिवाराज विद्यामंदिर येथे मोठी कारवाई केली. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) श्रीमती पवनजीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त सोमनाथ बनकर यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.
मंगळवारी सकाळी ९ वाजता सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ११ हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे कच्चे आर.सी.सी. बांधकाम निष्कासित करण्यात आले.
या कारवाईसाठी बांधकाम विकास विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष लांडेकर, उपअभियंते विवेक डुबेवार, अविनाश कामठे, संदीप शिंदे, प्रशांत महिंदकर तसेच कनिष्ठ अभियंते अस्मिता कुटे, मंगेश गायकवाड, सुशील मोहिते आणि राजेश फरास यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कारवाईदरम्यान पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला पोलिस प्रशासनाचीही साथ मिळाली. ९ पोलीस अधिकारी, १६ पोलीस कर्मचारी, ३५ एम.एस.एफ. जवान, ३ जेसीबी, २ गॅसकटर, ४ ब्रेकर, १ जॉ-कटर आणि २० बिगारी सेवक यांच्या मदतीने अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील नागरिकांनी पुणे महापालिकेचा डी.पी. मंजूर होईपर्यंत कोणत्याही बेकायदेशीर प्लॉटिंगमध्ये प्लॉट खरेदी करून त्यावर अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच शहरात अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास पुणे महापालिकेमार्फत नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नागरिकांना देण्यात आला आहे.




























