पुणे,दि.०१ : – अंमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांविरोधात कोंढवा पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत अवघ्या ४८ तासांत दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत गांजा व एमडीसह एकूण सुमारे ८ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहिल्या कारवाईत दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी अंमली पदार्थविरोधी गस्त घालत होते. त्यावेळी एल.के. अपार्टमेंटसमोर, सार्वजनिक रोडवर, गल्ली नं. १, अजमेरा पार्क, कोंढवा खुर्द येथे संशयास्पदरीत्या उभा असलेला अमीर अकबर शेख (वय ३६) याच्यावर पोलिसांना संशय आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १४४ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा, रोख रक्कम, गांजा वाहतुकीसाठी वापरली जाणारी कार, दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे तसेच पारदर्शक पिशव्या असा एकूण ५ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी कोंढवा पोलिसांना हद्दीतील पॅराडाईज इन लॉजमधील एका रूममध्ये एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ छापा टाकून अजीम सलीम शेख (वय ३७) याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून १२ ग्रॅम १० मिलीग्रॅम एमडी पावडर, रोख रक्कम, दोन मोबाईल फोन आणि इंजेक्शन सिरिंज असा एकूण २ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणीही कोंढवा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक तसेच सेवन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू असून, नागरिकांनी परिसरात अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ कोंढवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गुप्त ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग रामदास इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेमाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष चौधरी यांच्या सूचनेनुसार कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली.



























