पिंपरी-चिंचवड,दि.०३ :- स्टार बाजारातून खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंची चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा वाकड पोलिसांच्या जाळ्यात. या कारवाईत चार महिला आणि तीन पुरुष अशा सात आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली इनोव्हा कार आणि सुमारे २९ हजार ९६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाकड परिसरातील यशवंत विहारमधील स्टार बाजार येथे खाद्यपदार्थांची चोरी झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना वाकड पोलिसांच्या तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.
चोरीनंतर आरोपी इनोव्हा कारमधून मुंबईच्या दिशेने गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पुन्हा हे वाहन पुणे-पिंपरी-चिंचवडच्या दिशेने आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून वाहनाचा शोध घेतला असता आरोपी वाकड परिसरात आढळून आले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रविकांत देवानंद जाधव, किशोर सिताराम महेरिया, किशोर बाळू यादव, सोनम बाबू शेख, सलमा शकील शेख, सावित्री वाजुभिया शेख आणि रेशमा विजय महेरिया यांचा समावेश आहे.
पोलिसांच्या तपासात या टोळीने काटे पिंपळे येथील स्टोअर बाजार, कासारवाडी फाटा, वाघोली तसेच पुणे परिसरातील इतर स्टार बाजारांमधून काजू, बदाम व इतर खाद्यपदार्थांची चोरी केल्याचेही निष्पन्न झाले आहे.
आरोपींकडून चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार तसेच चोरीचा मुद्देमाल असा एकूण २९ हजार ९६० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींची पार्श्वभूमी तपासली जात असून, पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई तसेच महाराष्ट्रातील इतर भागात अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसराज तेली, पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.




























