पुणे,दि.२५ :- शहरातील सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि फ्रंट मार्जिनवरील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात पुणे महानगरपालिकेच्या औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने मंगळवारी (दि. २५ नोव्हेंबर) धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत तब्बल ३० हजार २०० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे निष्कासित करून सार्वजनिक जागा मोकळी करण्यात आली.
उप आयुक्त सोमनाथ बनकर (अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग), उप आयुक्त अविनाश सपकाळ (परिमंडळ क्र. २) आणि सहायक आयुक्त इंद्रायणी करचे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
औंध रस्ता, खडकी तसेच भाऊ पाटील रस्ता, बोपोडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. या भागातील रस्ते व पदपथांवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले व्यावसायिक स्टॉल, काउंटर, शेड आणि अन्य साहित्य हटविण्यात आले. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता, तसेच पादचाऱ्यांना पदपथावरून चालणेही कठीण झाले होते.
या कारवाईदरम्यान एकूण ७३ शेड, ९ अनधिकृत स्टॉल आणि ७३ कच्च्या-पक्क्या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच दुकानांसमोर लावण्यात आलेले अनधिकृत बोर्ड, बॅनर आणि जाहिरात साहित्यही हटविण्यात आले. जप्त करण्यात आलेले साहित्य औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या महापालिका गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले आहे.
दरम्यान, बांधकाम विकास विभाग, झोन क्रमांक ६ यांच्यामार्फत औंध रस्ता खडकी आणि भाऊ पाटील रस्ता बोपोडी परिसरातील फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत कच्च्या व पक्क्या बांधकामांवरही कारवाई करण्यात आली. यात एकूण ३० हजार २०० चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
या मोहिमेसाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी, ५ मनपा पोलीस, १७ एमएसएफ जवान, ३७ बिगारी सेवक, ४ जेसीबी, २ गॅस कटर आणि २ ओपन ट्रक तैनात करण्यात आले होते.
सार्वजनिक रस्ते व पदपथ नागरिकांसाठी मोकळे ठेवणे, वाहतूक सुरळीत करणे आणि अनधिकृत अतिक्रमणांना आळा घालणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.




























