पुणे, दि. २५ :- पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ समोर बुधवारी भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहा हल्लेखोर दोन दुचाकींवरून घटनास्थळी आले होते. त्यांच्याकडे बंदूक आणि कोयते होते. सुरुवातीला एका हल्लेखोराने बंदूक काढून गोळीबार केला, तर अन्य हल्लेखोरांनी संबंधित व्यक्तीवर कोयत्याने वार केले. हल्ला झाल्यानंतर जखमी व्यक्तीने न्यायालयाच्या आवारात पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून पुन्हा वार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
हल्ल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला रिक्षातून रुग्णालयात दाखल केले. गुन्हे शाखेचे पथक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, फॉरेन्सिक पथकाकडूनही तपास सुरू करण्यात येत आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
हल्ल्याचे नेमके कारण काय, जखमी व्यक्ती कोण आहे आणि या हल्ल्यामागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.




























