यावल दि. २५ :- जळगाव प्रतिनिधी :- यावल शहरासह रावेर तालुक्यात अवैध धंद्यांच्या वाढत्या चर्चांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अवैध वाळू वाहतूक, पत्त्यांचे क्लब,जुगार अड्डे तसेच इतर कथित अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पुढे येत आहेत.या प्रकारांना काही राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा प्रभावशाली व्यक्तींचा अप्रत्यक्ष पाठिंबा अथवा हस्तक्षेप असल्याच्या चर्चाही परिसरात सुरू आहेत.मात्र,या आरोपांची अधिकृत चौकशी होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे.
काही ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांवर राजकीय व सामाजिक प्रभाव टाकला जात असल्याची चर्चा असून,काही व्यक्ती ( कलेक्शन करणारे ) वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे आणि प्रशासनापर्यंत पोहोचणारी माहिती कितपत वस्तुनिष्ठ आहे, याची स्वतंत्रपणे पडताळणी होण्याची गरज निर्माण झाली आहे.
अवैध वाळू वाहतुकीमुळे अपघाताचा धोका ; रिक्षाला कट मारून डंपर पसार.?
बुधवार, दि. २५ रोजी रात्री सुमारे १.३० वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका डंपरने प्रवासी असलेल्या रिक्षाला कट मारून घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेनंतर रात्रीच्या वेळी मोठा जमाव जमल्याचेही सांगण्यात येत आहे. परंतु घटनास्थळी लेडीज पोलीस प्रशासन हजर झाल्याने पुढील चौकशी सुरू झाली.
या घटनेप्रकरणी यावल पोलिसांनी नेमकी कोणती कारवाई केली ? संबंधित डंपरचा शोध घेण्यात आला का.? वाहनाची कागदपत्रे,वाळू वाहतुकीचा परवाना आणि चालकाची माहिती तपासण्यात आली का ? याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
रात्रीच्या अवैध वाहतुकीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याने या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.
रिपब्लिकन सेनेचे पोलिसांना लेखी निवेदन ; जुगार अड्डे बंद करण्याची मागणी
दरम्यान यावल शहरातील फालकनगर,भुसावळ रोड, जिनिंग प्रेस परिसरासह विविध भागांत सुरू असल्याचा आरोप असलेले अवैध पत्त्यांचे क्लब व जुगार अड्डे तात्काळ बंद करण्यासाठी रिपब्लिकन सेना, यावल तालुका शाखेच्या वतीने पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
तालुकाध्यक्ष नितीन बोरेकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात या कथित जुगार अड्ड्यांमुळे परिसरातील शांतता,सामाजिक वातावरण आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः तरुण पिढी, कष्टकरी वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक जुगाराच्या आहारी जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.तसेच सायंकाळी व रात्रीच्या वेळी या परिसरातून ये-जा करणाऱ्या महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या
रिपब्लिकन सेनेने पोलीस प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत.
फालक नगर,भुसावळ रोड, जिनिंग प्रेस परिसरासह संशयित ठिकाणी तातडीने तपासणी व छापे टाकून अवैध जुगार अड्ड्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
जुगार अड्डे चालक, मालक, व्यवस्थापक, आर्थिक व्यवहार करणारे आणि प्रत्यक्ष सहभागी असलेल्यांची चौकशी करून लागू कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत.
अशा अवैध धंद्यांना आर्थिक मदत किंवा संरक्षण दिले जात असल्याचे पुरावे आढळल्यास संबंधितांचीही कायदेशीर चौकशी करावी.
यापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारी, दाखल गुन्हे, झालेली कारवाई आणि प्रलंबित अर्जांची सद्यस्थिती तपासावी.
संबंधित परिसरात दिवसा व रात्री नियमित पोलीस गस्त वाढवून अवैध धंदे पुन्हा सुरू होणार नाहीत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
निवेदनाच्या अनुषंगाने केलेल्या प्रत्यक्ष कारवाईचा लेखी अहवाल रिपब्लिकन सेना, यावल तालुका शाखेला द्यावा.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय विशेष पथक नेमावे!
यावल–रावेर तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक,जुगार अड्डे आणि इतर अवैध व्यवसायां बाबत वारंवार तक्रारी पुढे येत असल्याने जिल्हाधिकारी, जळगाव यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्या विविध स्तरांतून होत आहे. प्रांताधिकारी,
यावल,रावेर तहसीलदार,पोलीस विभाग तसेच महसूल व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले स्वतंत्र जिल्हास्तरीय विशेष तपासणी पथक नियुक्त करावे.या पथकाने कोणत्याही स्थानिक दबावाला बळी न पडता अचानक तपासण्या करून अवैध वाळू वाहतूक,जुगार अड्डे आणि अन्य बेकायदेशीर व्यवसायांची वस्तुस्थिती तपासावी.
याशिवाय,अवैध धंद्यांशी संबंधित आर्थिक व्यवहार कथित कलेक्शन करणाऱ्या व्यक्तींची भूमिका आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या माहितीचीही पुराव्यांच्या आधारे चौकशी करावी,अशी मागणी पुढे येत आहे.
तक्रारदार आणि प्रसिद्धी माध्यमांवर दबाव आणण्याच्या चर्चाही चिंताजनक —
विशेष म्हणजे,अवैध धंद्यांविरोधात तक्रारी करणारे नागरिक तसेच प्रसिद्धी माध्यमांतून स्थानिक प्रश्न मांडणाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याच्या आणि खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याच्या चर्चाही समोर येत आहेत.या चर्चांची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे.
लोकशाही व्यवस्थेत तक्रार करणे,प्रशासनाचे लक्ष वेधणे आणि जनहिताचे प्रश्न मांडणे हा नागरिकांचा अधिकार आहे. त्यामुळे तक्रारदारांना संरक्षण मिळावे आणि कोणत्याही व्यक्तीवर दबाव किंवा सूडबुद्धीने कारवाई होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घेणे गरजेचे आहे.
आंदोलनाचा इशारा ; आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
रिपब्लिकन सेनेने निवेदनात स्पष्ट केले आहे की, तक्रारीची तातडीने दखल घेऊन ठोस कारवाई न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल. त्यामध्ये यावल–चोपडा रोडवर रास्ता रोको आंदोलन तसेच वरिष्ठ पोलीस प्रशासन व शासनाकडे तक्रार करून संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
एकीकडे अवैध धंद्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, दुसरीकडे अवैध वाळू वाहतुकीमुळे अपघाताचा धोका आणि आता जुगार अड्ड्यांविरोधात संघटनेचे लेखी निवेदन… या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर यावल पोलिसांसह महसूल प्रशासन नेमकी कोणती ठोस भूमिका घेते,हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अवैध धंद्यांना कोणाचेही राजकीय किंवा सामाजिक पाठबळ असो, पुरावे आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई व्हावी. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर अप्रिय घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का.? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.




























