पुणे ग्रामीण.शिक्रापूर,दि.२७ :- ओडिशातून गांजा घेऊन पुण्याच्या दिशेने येणाऱ्या आंतरराज्यीय गांजा तस्करांना पुणे ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २३५ किलो ३२० ग्रॅम वजनाचा गांजा, एक महिंद्रा XUV 700 कार आणि दोन मोबाईल फोन असा एकूण १ कोटी ५२ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पथक २५ नोव्हेंबर रोजी रात्री गस्त घालत असताना २६ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे १.१० वाजण्याच्या सुमारास पुणे शहर अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जीवन माने यांना गोपनीय माहिती मिळाली. ओडिशातून गांजा घेऊन काही इसम महिंद्रा XUV 700 कारमधून हैदराबाद-सोलापूर मार्गे पुण्याच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर सापळा रचला. दरम्यान, सदर संशयित कार कुरकुंभ परिसरातून दौंडच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर दौंड पोलिसांना सतर्क करण्यात आले. मात्र, कारचालक पोलिसांना हुलकावणी देत काष्टीमार्गे शिक्रापूरच्या दिशेने जात असल्याचे समोर आले.
यानंतर शिक्रापूर पोलिसांना माहिती देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक केणकर यांनी पथकासह हिवरा जंक्शन, पुणे-नगर रोड आणि गोलेगाव रोडवरील सुंदर सृष्टी अपार्टमेंटजवळ अशा तीन ठिकाणी तातडीने नाकाबंदी केली.
यानंतर शिक्रापूर पोलिसांना माहिती देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक केणकर यांनी पथकासह हिवरा जंक्शन, पुणे-नगर रोड आणि गोलेगाव रोडवरील सुंदर सृष्टी अपार्टमेंटजवळ अशा तीन ठिकाणी तातडीने नाकाबंदी केली.
२६ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास संशयित कार भरधाव वेगाने येताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी थांबण्याचा इशारा करूनही चालकाने वाहन न थांबवता शिक्रापूर शहराच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी शासकीय वाहनाने पाठलाग सुरू केला. अखेर पहाटे सुमारे ३.२५ वाजता स्टेट बँक कॉलनीतील सत्यमामा निवास बिल्डिंगसमोरील मोकळ्या जागेत कारसह दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
2. समीर पुरुषोत्तम राऊत (वय २४), व्यवसाय – पेपर ब्लॉक ऑपरेटर, रा. सांगोळा वाडा, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती.
पोलिसांनी आरोपींकडून २३५ किलो ३२० ग्रॅम गांजा, एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा XUV 700 कार (क्रमांक MH-27-DL-6984) तसेच सॅमसंग आणि ओप्पो कंपनीचे दोन मोबाईल फोन असा एकूण १ कोटी ५२ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार अर्जुन साहेबराव भालसिंग यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(क), २२(क), २५ व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरांना गांजा पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असून, या तस्करीच्या साखळीतील आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास पुणे ग्रामीण पोलीस करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जीवन माने तसेच दोन्ही पथकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.




























