परभणी,दि.२७ :- प्रतिनिधी :- आश्वासन देणारे अनेक असतात, मात्र दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण करणारे मोजकेच असतात. मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे संचालक तथा मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी याचा प्रत्यय परभणीतून दिला आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आयोजित भव्य महिला बचत गट मेळाव्याच्या निमित्ताने दि. 24 नोव्हेंबर रोजी परभणीत आलेले सलीम सारंग यांनी शिक्षण क्षेत्रासाठी दिलेला शब्द पूर्ण केला. परभणी येथील फैज कॅम्पसला त्यांनी १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
१५ ऑगस्ट रोजी परभणी येथील फैज कॅम्पस येथे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात उपस्थित असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी स्मार्ट डिजिटल बोर्ड उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता. विशेषतः यूपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, हा त्यामागील उद्देश होता.
आपल्या परभणी दौऱ्यादरम्यान त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करत फैज कॅम्पसला १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. हा धनादेश शाळेचे मुख्याध्यापक सनाउल्लाह खान, शिक्षक सोहेल खान व शाळेतील कर्मचारी यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
यावेळी सलीम सारंग यांनी आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात यूपीएससी आणि एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३५ अभ्यासिका केंद्र सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला. ग्रामीण आणि शहरी भागातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
“विद्यार्थ्यांच्या हातात आधुनिक शैक्षणिक साधने आणि डोळ्यांत मोठी स्वप्ने असली पाहिजेत. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचे स्वप्न अपूर्ण राहू नये, यासाठी शिक्षण क्षेत्रात सातत्याने योगदान देत राहणार,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
शिक्षणासाठी दिलेला शब्द पूर्ण करण्यापासून ते संपूर्ण महाराष्ट्रात ३५ अभ्यासिका केंद्र उभारण्याच्या संकल्पापर्यंतचा हा प्रवास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.




























