पिंपरी-चिंचवड,दि.15:- पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत ७० पेक्षा अधिक चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या आणि पोलिसांवर गोळीबार करून फरार झालेल्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपी शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. उदगीर, जि. लातूर) याला दिघी परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
आरोपीच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. शेखर जाधव हा यापूर्वी पोलिस पथकावर गोळीबार करून फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने तांत्रिक तपास, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि विविध जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम राबवली.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला दिघी येथील मैदान परिसरातून अटक केली. त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते व त्यांच्या पथकाने केली.



































