पुणे,दि.३:- महाराष्ट्र विधानमंडळाच्या चालू पावसाळी अधिवेशनादरम्यान, शिवजीनगर मतदारसंघाचे आमदार. शिरोळे यांनी पुणे शहरातील वाढत्या नागरी समस्यांकडे, विशेषतः रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण आणि अनधिकृतपणे सुरू असलेल्या प्री-स्कूल (नर्सरी) शाळांवर सभागृहाचे लक्ष वेधले. नियम २९३ च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी या गंभीर बाबींवर राज्य सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी केली.
पुणे शहराच्या विकासाला अतिक्रमणामुळे गालबोट लागत असून, पुणेकरांमधून यावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आमदार शिरोळे यांनी फर्ग्युसन कॉलेज रस्त्याचे उदाहरण देत सांगितले, “मी स्वतः फर्ग्युसन कॉलेज परिसरात राहतो. हा रस्ता केवळ पुण्यासाठीच नव्हे, तर जगभरात एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रतिष्ठित रस्ता म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर अनधिकृत खोकी आणि बॉक्सेस लावून अतिक्रमण करण्यात आले आहे. हे वाढत जाणारे अतिक्रमण म्हणजे पुणे शहराला लागलेला एक मोठा कॅन्सर ठरत आहे. पूढील काही वर्षांत हे वेळेत रोखले नाही, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
तसेच अनधिकृत प्री-स्कूल आणि नर्सरींवर नियंत्रणाची आहे असा मुद्दा उपस्थित केला. या शाळा कोणत्याही ठोस नियमावलीशिवाय किंवा सुरक्षेच्या मानकांशिवाय सुरू आहेत. यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेला आणि भविष्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
अखेर, पुणे शहरातील हे वाढते अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे, तसेच विनापरवाना चालणाऱ्या बालवाड्या या दोन्ही संवेदनशील विषयांवर राज्य सरकारने पुणे महानगरपालिका आणि संबंधित प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी अध्यक्ष महोदयांमार्फत शासनाला केली.



























