मुंबई, २३ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माजी उपसभापती तथा शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे लिखित ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन सोमवारी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईतील लोकभवनाच्या जलभूषण सभागृहात झाले. मैत्री पब्लिकेशनतर्फे प्रकाशित या खंडात २०१४ ते २०२० या सहा वर्षांत डॉ. गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत मांडलेले प्रश्न, त्यांवर शासनाने दिलेली उत्तरे आणि त्यानंतर केलेला पाठपुरावा एकत्र वाचायला मिळतो.
सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, गृह राज्यमंत्री योगेश कदम, विधानपरिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर, ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रवीण दवणे आणि प्रकाशिका मोहिनी कारंडे उपस्थित होते.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या विधानपरिषदेतील पाच कार्यकाळांचा उल्लेख करून ही वाटचाल महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे सांगितले. सत्ताधारी बाकांवरून, विरोधी बाकांवरून आणि उपसभापती म्हणून पीठासीन आसनावरून त्यांनी एकाच सभागृहाचे काम पाहिले. त्यामुळे सभागृह कसे चालते, याचे अनेक पैलू त्या वाचकांसमोर मांडू शकतात, असे राज्यपाल म्हणाले. अन्यायग्रस्त महिला आणि बालकांच्या पाठीशी प्रत्यक्ष उभे राहणे ही सार्वजनिक जीवनातील मोलाची कृती आहे, असेही त्यांनी नमूद केले. डॉ. गोऱ्हे यांच्या पुढील खंडाची आपल्याला प्रतीक्षा असेल, असे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपला प्रश्न सभागृहात कुठे मांडला, सरकारने काय उत्तर दिले आणि पुढे प्रत्यक्षात काय झाले, हे नागरिकांना जाणून घ्यायचे असते. डॉ. गोऱ्हे यांच्या पुस्तकात या तिन्ही प्रश्नांची उत्तरे सापडतात, म्हणून या खंडाला सामाजिक संदर्भग्रंथाचे मोल आहे. पीडित महिलेला भेटून तिचे म्हणणे ऐकणे, पोलीस आणि प्रशासनाशी संपर्क साधणे आणि तिला वैद्यकीय मदत, समुपदेशन व कायदेशीर आधार मिळतो आहे का, हे पाहणे, या त्यांच्या कार्यपद्धतीचा शिंदे यांनी विशेष उल्लेख केला. ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी आणि पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्यांसंदर्भातील राज्यस्तरीय कार्यदलाच्या अध्यक्षा म्हणून त्या करत असलेल्या कामाचाही त्यांनी गौरव केला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी डॉ. गोऱ्हे यांच्यासोबत विधिमंडळात काम करतानाची एक आठवण सांगितली. सभागृहात बोलण्यासाठी त्या उभ्या राहिल्या की, कोणत्या नियमाखाली मुद्दा मांडत आहेत, हे सुरुवातीलाच स्पष्ट करत. उपसभापती म्हणून काम पाहतानाही त्यांनी हाच अभ्यास आणि शिस्त जपली, असे नार्वेकर म्हणाले. सभागृहातील गोंधळाकडे माध्यमांचे लक्ष पटकन जाते. त्याच सभागृहात एखाद्या प्रश्नावर सदस्याने केलेली तयारी आणि त्यासाठी घेतलेले परिश्रम मात्र नागरिकांपर्यंत पोहोचतीलच असे नाही. गोऱ्हे यांचा ग्रंथ ही उणीव भरून काढतो, असे त्यांनी सांगितले.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, नागरिक अनेकदा आमदारांना त्यांच्या कामाविषयी विचारतात. त्या प्रश्नाचे उत्तर त्यांना प्रत्यक्ष कामाच्या नोंदींतून मिळावे, यासाठी हा खंड तयार केला. महिला व बालकांची सुरक्षितता, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न, आरोग्य, पर्यावरण आणि पुणे परिसरातील स्थानिक प्रश्न यांवरील चर्चांसोबतच विधेयके, अर्थसंकल्प आणि पुरवणी मागण्यांवरील कामाचाही त्यात समावेश आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाचे स्मरण करून डॉ. गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत बोलण्याची संधी देणारे तत्कालीन सभापती आणि सहकारी सदस्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या खंडासाठी प्रकाशिका मोहिनी कारंडे, विशेष कार्य अधिकारी योगेश जाधव आणि कार्यालयातील सहकाऱ्यांनी सुमारे अडीच वर्षे काम केल्याचे सांगून त्यांनी सर्वांचे आभार मानले.
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले आणि कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानले.




























