पुणे,दि.30 :- पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार उपआयुक्त (अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन) सोमनाथ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पेठ-वाघोली गट क्रमांक १४२६ व १४२७ येथे बुधवारी (दि. २९ जुलै २०२६) सकाळी अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई करण्यात आली.
या कारवाईत तब्बल १ लाख ६८ हजार ५०० चौरस फुटांचे कच्चे व पक्के आरसीसी अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. कारवाईदरम्यान बांधकाम विकास विभागाचे कनिष्ठ अभियंता . सुशील मोहिते, उपअभियंता. विवेक डुबेवार तसेच कार्यकारी अभियंता श्री. संतोष लांजेकर उपस्थित होते.
कारवाई यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पुणे महापालिकेसह पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यामध्ये १ पोलीस अधिकारी, ६ पोलीस कर्मचारी, २० एसआरपीएफ जवान, ४ जेसीबी, २ गॅस कटर, ४ ब्रेकर आणि १० बिगारी सेवकांचा सहभाग होता.
दरम्यान, उपआयुक्त श्री. सोमनाथ बनकर यांनी नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. पुणे महानगरपालिकेचा विकास आराखडा (डीपी) मंजूर होईपर्यंत कोणत्याही बेकायदेशीर प्लॉटिंगमध्ये प्लॉट खरेदी करू नये किंवा त्यावर अनधिकृत बांधकाम करू नये. अन्यथा अशा बांधकामांवर महापालिकेकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.




























