पुणे, दि. २९ :- प्रतिनिधी संकेत काळे :- चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या वतीने बुधवारी पाषाण पोलीस चौकी हद्दीतील नागरिकांसोबत संवाद बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम
भजनावळे यांनी पाषाण परिसरातील सर्वसामान्य नागरिक, दक्षता समितीचे सदस्य तसेच मोहल्ला शांतता समितीच्या समस्या ऐकून घेतल्या.
यावेळी पाषाण पोलीस चौकीचे, प्रभारी अधिकारी ए.पी.आय. शोभा भांडवलकर, तपास पथकातील ए.पी.आय. अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार संदीप शिंदे, दक्षता कमिटीचे अध्यक्ष/सदस्य प्रतिभा जाधव, मोहल्ला शांतता कमिटीचे सदस्य इम्रान शेख व त्यांचे सहकारी यांच्या सह पाषाण पंचवटी, सोमेश्वर वाडी परिसरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान नागरिकांनी परिसरातील वाहतूक, कायदा व सुव्यवस्था, संशयास्पद व्यक्तींची वर्दळ, रात्रीची गस्त, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, तसेच इतर स्थानिक समस्यांबाबत आपली मते व अडचणी मांडल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी प्रत्येक मुद्दा गांभीर्याने ऐकून घेत संबंधित समस्यांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी नागरिकांनी पोलिसांसोबत सातत्याने संपर्क ठेवावा, परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा गुन्हेगारी स्वरूपाची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि शांतता व सलोखा कायम राखण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.
पोलीस व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करून सुरक्षित, शांततापूर्ण आणि गुन्हेमुक्त परिसर निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा बैठका नियमितपणे आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपस्थित नागरिकांनीही पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करत परिसरातील सुरक्षिततेसाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.



























