पुणे,दि.२६: – पुण्यातील सेव्हन लव्ह्ज चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित (AC) बसने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडली. सुदैवाने, या दुर्घटनेत बसमधील सर्व १७ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बस स्वारगेटकडे जात असताना अचानक वाहनातून धूर व ज्वाला दिसू लागल्या. चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेतली. याचदरम्यान अग्निशामक दल, स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. सर्वांच्या संयुक्त आणि सतर्क प्रयत्नांमुळे प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे १७ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

























