पुणे,दि..२४ : – जमिनीच्या वादातून एका व्यक्तीचा खून करण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी देऊन त्याच्यावर धारदार कटरने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणात बंडगार्डन पोलिसांनी एका १९ वर्षीय तरुणाला अटक केली असून, एका १५ वर्षीय विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यामागे जमिनीचा वाद असल्याचे तपासात समोर आले असून, मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.
या घटनेप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात २३ सप्टेंबर रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक २४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा माग
गुन्ह्याचा तपास सुरू असताना बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढला. हल्लेखोर दुचाकी क्रमांक एमएच १२ व्हीवाय ७६४३ वरून फिरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी आनंद बाबा गव्हाणे (वय १९, रा. गुलटेकडी, पुणे) याच्यासह एका १५ वर्षीय विधी संघर्ष बालकाला २३ ऑक्टोबर २०२६ रोजी दांडेकर पूल परिसरातून ताब्यात घेतले. पोलीस पथकाने त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, या गुन्ह्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
जमिनीच्या वादातून ५० हजारांची सुपारी दिल्याचा आरोप
त्यानुसार, मुख्य आरोपीच्या सांगण्यावरून फिर्यादीवर हल्ला केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून, हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला कटर किंवा ब्लेड मुख्य आरोपी प्रवीण सूर्यवंशी याने पुरविल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
बंडगार्डन पोलिसांच्या पथकाची कामगिरी
ही कामगिरी बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनोद सलगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकाचे प्रभारी राहुल पवार, सहाय्यक पोलीस फौजदार प्रदीप शितोळे, प्रकाश आव्हाड, सारस साळवी, निलेश पालवे, ज्ञानेश्वर गायकवाड, ज्ञानेश्वर बडे, महेश जाधव, मनोज भोकरे, शिवाजी सरक आणि अनिकेत माने यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेणे आणि गुन्ह्याच्या कटासंदर्भातील पुढील तपास करणे सुरू आहे.

























