पुणे : कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने पुणेकरांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी शहरातील महापालिकेच्या हद्दीतील उद्याने रात्री १२ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना कुटुंबीयांसह चांदण्यांच्या प्रकाशात कोजागिरी पौर्णिमेचा आनंद घेता येणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत शहरात एकूण २१६ उद्याने विकसित करण्यात आली असून, या उद्यानांना नागरिक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा मिळावा आणि सार्वजनिक उद्यानांचा अधिकाधिक लाभ घेता यावा, या उद्देशाने उद्यानांच्या वेळेत विशेष वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार, रविवारी उद्याने सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुली राहणार आहेत. या सुविधेमुळे पुणेकरांना रात्रीच्या शांत वातावरणात उद्यानांमध्ये फेरफटका मारता येणार असून, कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची संधी मिळणार आहे.
पुणे महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ६६(१०) अन्वये सार्वजनिक उद्याने, बागा आणि मनोरंजनासाठी मोकळ्या जागा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची महत्त्वाची जबाबदारी आहे. याच अनुषंगाने उद्यान विभागाकडून शहरातील उद्यानांचा विकास आणि देखभाल केली जाते.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देण्यात आलेल्या या विशेष सुविधेचा पुणेकर नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेचे सहमहापालिका आयुक्त तथा उद्यान विभागाचे प्रमुख डॉ. अशोक दि. घोरपडे यांनी केले आहे.

























