पुणे,दि.०४ :- कार्यसम्राट आमदार स्वर्गीय विनायकआबा निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रतिभावान आणि गरजू विद्यार्थ्यांना ‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ प्रदान करण्यात येणार आहे. हा शिष्यवृत्ती वितरण समारंभ बुधवार, ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व निम्हण परिवाराचे मार्गदर्शक डॉ. शां. ब. मुजुमदार तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक बाळासाहेब अनास्कर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी आमदार सिद्धार्थदादा शिरोळे, पुण्यनगरीच्या महापौर मंजुषाताई नागपुरे, उपमहापौर परशुरामजी वाडेकर, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
स्व. विनायकआबा निम्हण यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गुणवंत तसेच गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या ज्ञानयज्ञाचा साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी केले आहे.




























