पुणे,दि.२५ :- सायबर फसवणुकीच्या प्रकरणात तातडीने तपास करत बाणेर पोलिसांनी तब्बल २० लाख रुपयांची रक्कम फिर्यादीला परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे. बाणेर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात सायबर तपास पथकाने संबंधित बँक व मर्चंटशी प्रभावी पत्रव्यवहार करून फसवणुकीची रक्कम परत मिळवण्यासाठी कार्यवाही केली.
दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्यादीसोबत आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली होती. तक्रार प्राप्त होताच बाणेर पोलीस ठाण्याच्या सायबर तपास पथकाने तात्काळ कार्यवाही सुरू केली.
सायबर फसवणुकीशी संबंधित व्यवहारांची तपासणी करून संबंधित बँक व मर्चंट यांच्याशी प्रभावी पत्रव्यवहार करण्यात आला. आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर करून फसवणुकीची रक्कम परत मिळविण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांमुळे २०,००,००० रुपये (वीस लाख रुपये) इतकी रक्कम न्यायालयाच्या आदेशान्वये फिर्यादीस परत मिळवून देण्यात आली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, परिमंडळ-८ चे पोलीस उपआयुक्त चिन्मुल्ला रजनीकांत, खडकी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खिलारे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, पोलीस अंमलदार शिंदे, योगिता मिसाळ, दत्ता काळे, खेडे तसेच बाणेर पोलीस ठाण्याच्या सायबर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ही कामगिरी केली.
नागरिकांसाठी सायबर सुरक्षेचे आवाहन
मोबाईल अपडेट, KYC, बँक खाते अपडेट किंवा अन्य कोणत्याही कारणाने अनोळखी व्यक्तीकडून मेसेज किंवा लिंक प्राप्त झाल्यास त्यावर क्लिक करण्यापूर्वी त्याची खात्री करावी. अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नये. तसेच OTP, PIN, CVV, UPI PIN, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून कमी कालावधीत मोठा व निश्चित परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या अनोळखी व्यक्ती, मोबाईल क्रमांक, सोशल मीडिया ग्रुप किंवा बनावट ॲप/वेबसाइटवरही विश्वास ठेवू नये.
सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in या राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवावी किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. तातडीने तक्रार केल्यास फसवणुकीची रक्कम होल्ड/फ्रीज करून ती परत मिळवून देण्यासाठी पोलिसांना कार्यवाही करणे शक्य होते.




























