पुणे,दि.२४ :- कोंढवा बुद्रुक येथील ’मांडोत टॉवर्स सोसायटी’ मधील रहिवाशांना बांधकाम व्यावसायिक आणि स्थानिक हॉटेल चालकाकडून होत असलेल्या त्रासाची, तसेच रहिवाशांवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यांची दखल शिवसेना उपनेत्या व विधान परिषद सदस्य आमदार डॉ. नीलम गोर्हे यांनी घेतली आहे. या पीडित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आगामी अधिवेशनात विधान परिषदेत आवाज उठविणार असल्याचे आश्वासन गोर्हे यांनी दिले आहे. सोसायटीचे रहिवासी प्रविण ओसवाल, राजेश इंद्रेकर, चंद्रकांत जैन, गणेश कर्नावट, अतुल कर्नावट आणि ऋषभ मेहता यांनी रहिवाशांच्या वतीने आमदार डॉ. नीलम गोर्हे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
सदनिका नियोजनानुसार नाहीत
बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकांची फसवणूक केली असून, मंजूर प्लॅननुसार नागरिकांना फ्लॅट दिलेले नाहीत. सोसायटीच्या परिसरातील हॉटेल व्यावसायिकाकडून रहिवाशांना नाहक मानसिक व शारीरिक त्रास दिला जात आहे. या त्रासाबाबत वारंवार तक्रार करूनही बांधकाम व्यावसायिक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.सोसायटीतील मूलभूत समस्या सुटाव्यात आणि न्याय मिळावा म्हणून रहिवाशांनी कायदेशीर मागणी केली असता, त्यांना धमकावण्यासाठी आणि त्यांचा आवाज दाबण्यासाठी रहिवाशांवरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रहिवाशांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आमदार डॉ. नीलम गोर्हे यांनी या प्रकरणावर चिंता व्यक्त केली.
तक्रारदार रहिवाशांवर आकसापोटी खोटे गुन्हे दाखल करून घेणारे पोलीस अधिकारी, संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि त्रास देणारे हॉटेल चालक यांच्याविरोधात सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी निवेदनात केली आहे. या प्रकरणात गृहविभाग आणि संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून नागरिकांना न्याय मिळवून देणार असल्याचे डॉ. गोर्हे यांनी स्पष्ट केले.




























