पुणे,दि.२८ : पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणाऱ्या बाणेर-पाषाण लिंक रोडच्या भूसंपादनाचा गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेला तिढा अखेर सुटला आहे. या रस्त्याच्या भूसंपादनाबाबत अंतिम निवाडा (अवॉर्ड) जाहीर करण्यात आला असून, सुमारे ६८ कोटी रुपयांचा मोबदला अदा करण्यात आला आहे. त्यानंतर पुणे महानगरपालिकेकडून प्रत्यक्ष जागेचा ताबा घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
पुणे शहराच्या मंजूर विकास आराखड्यानुसार (DP) मौजे पेठ पाषाण, ता. हवेली, जि. पुणे येथील सर्व्हे क्रमांक १३४ (पैकी) ते १३८ आणि १४० मधून ३६ मीटर रुंद विकास आराखडा रस्ता प्रस्तावित आहे. हा बाणेर-पाषाण लिंक रोड भूसंपादनाअभावी गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता.
या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुमारे ६८ कोटी रुपयांची भरपाई रक्कम अदा करण्यात आली आहे. कायदेशीर आणि आर्थिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत अंतिम निवाडा जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता संबंधित जागेवर प्रत्यक्ष जाऊन अधिकृत ताबा घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
बाणेर-पाषाण परिसराला मोठा दिलासा
बाणेर, पाषाण, सुतारवाडी आणि परिसरातील नागरिकांसाठी हा लिंक रोड महत्त्वाचा ठरणार आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर या भागातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून, प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळही कमी होण्याची अपेक्षा आहे.
महापालिका प्रशासनाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेला भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, भूसंपादन व व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त निखिल मोरे यांच्यासह संबंधित उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, मालमत्ता विभाग, बांधकाम विभाग आणि पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
विशेष भूमिसंपादन अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन आणि पुणे महानगरपालिका यांच्यातील समन्वयातून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात यश आले आहे.
ताबा मिळाल्यानंतर रस्त्याचे काम वेगाने होणार
प्रत्यक्ष जागेचा ताबा पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या पथ विभागामार्फत रस्त्याचे उर्वरित काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बाणेर-पाषाण लिंक रोडच्या कामाला आता गती मिळणार असून, हा रस्ता लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत खुला करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.



























