पुणे, दि. २६ : – श्री गणेश विसर्जन मिरवणूक दि२६ रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या वतीने मिरवणुकीच्या मार्गाची तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. उपआयुक्त परिमंडळ क्र. ५ अंतर्गत लक्ष्मी रोड, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्ता या परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात येत आहे.
मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, गुलाल, चपला तसेच इतर कचरा जमा झाल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आला. मात्र, मिरवणूक संपताच महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम सुरू करून संपूर्ण मिरवणूक मार्ग स्वच्छ करण्यास सुरुवात केली.
या स्वच्छता मोहिमेसाठी सहाय्यक आयुक्त श्री. राजेश गुर्रम, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. महेंद्र सावंत, श्री. निलेश चव्हाण यांच्यासह १५ आरोग्य निरीक्षक आणि सुमारे १ हजार स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच रस्त्यावरील धूळ आणि बारीक कचरा हटविण्यासाठी मेकॅनिकल स्वीपिंग मशीनचा वापर करण्यात येणार आहे.
नवल किशोर राम यांनी स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतला. तसेच उपायुक्त . माधव जगताप यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी करून साफसफाई व स्वच्छतेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक तसेच स्वच्छता सेवक उपस्थित होते.
मिरवणूक संपल्यानंतर काही वेळातच रस्त्यांची स्वच्छता सुरू करण्यात आल्याने नागरिकांना वाहतुकीसाठी स्वच्छ व सुरक्षित रस्ते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या यंत्रणेने तत्परतेने काम केले.



























