पुणे,दि.4 : – उचललेल्या पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाच्या कारणावरून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला यवतमाळ जिल्ह्यात नेणाऱ्या टोळीचा उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी यवतमाळ येथून आठ आरोपींना अटक करून अपहृत व्यक्तीची अवघ्या २४ तासांच्या आत सुखरूप सुटका केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिघांनी राजेश चव्हाण यांचे मोटारसायकलसह अपहरण केले होते. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान आरोपी अमोल रामराव राठोड, सचिन रामराव राठोड, निलेश संतोष राठोड, शुभम प्रभाकर जाधव, संदीप गुलाब राठोड, इंदल धायरा जाधव, राजू बापूराव चव्हाण आणि संदीप उदयभान जाधव यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी अपहृत व्यक्तीला यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड परिसरात नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत उमरखेड येथे जाऊन अपहृत व्यक्तीची २४ तासांच्या आत सुखरूप सुटका केली.
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली तीन ऑटो रिक्षा, अपहृत इसमाची शाईन मोटारसायकल आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तपास पथक करीत आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सुभाष सुऱ्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.




























