पुणे, दि. २१ :- पुणे शहरातील सार्वजनिक जागा, पदपथ आणि रस्त्यांवरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील सात क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत अनधिकृत दुकाने, शेड, व्यावसायिक साहित्य तसेच इमारतींच्या फ्रंट मार्जिनमध्ये केलेली अतिक्रमणे हटविण्यात आली. या मोहिमेत हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत तब्बल ६१ अनधिकृत दुकाने हटविण्यात आली.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत औंध-बाणेर, कोंढवा-उंड्री, धनकवडी-कात्रज-आंबेगाव, नगर रोड-वाघोली, बिबवेवाडी, हडपसर-मांजरी आणि येरवडा-वडगावशेरी या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कारवाई करण्यात आली.
औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दोन ठिकाणी कारवाई करून अनधिकृत व्यावसायिक, शेतकरी आठवडे बाजारातील अतिक्रमणे आणि व्यावसायिक साहित्य हटविण्यात आले. कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दोन ठिकाणी अनधिकृत दुकाने व शेडवर कारवाई करण्यात आली. तसेच साळुंखे विहार परिसरातील फ्रंट मार्जिनमध्ये करण्यात आलेले अतिक्रमणही निष्कासित करण्यात आले.
धनकवडी-कात्रज-आंबेगाव क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत फ्रंट मार्जिनमध्ये उभारण्यात आलेले अनधिकृत शेड हटविण्यात आले. नगर रोड-वाघोली क्षेत्रीय कार्यालयाने येरवडा-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय आणि बांधकाम विकास विभागाच्या समन्वयाने संयुक्त कारवाई केली. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतही बांधकाम विकास विभाग आणि अतिक्रमण विभागाच्या संयुक्त पथकाने अतिक्रमणे हटविली.
दरम्यान, हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत ६१ अनधिकृत दुकाने हटविण्यात आली. येरवडा-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतही बांधकाम विकास विभागाच्या सहकार्याने संयुक्त अतिक्रमण निष्कासन मोहीम राबविण्यात आली.
नागरिकांना मोकळे पदपथ आणि अडथळेमुक्त रस्ते उपलब्ध करून देणे, सार्वजनिक जागांचे संरक्षण करणे तसेच वाहतुकीतील अडथळे दूर करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. शहरातील अतिक्रमणांवर यापुढेही नियमितपणे कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



























