श्रीगोंदा,दि.११ :- आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या ‘डायल ११२’ या हेल्पलाईन क्रमांकावर गोळी मारून एका व्यक्तीचा खून झाल्याची खोटी माहिती देऊन पोलीस यंत्रणेची दिशाभूल केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन विश्वनाथ शिंदे (रा. कोसेगव्हाण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना ९ ऑक्टोबर २०२६ रोजी घडली.
खुनाची खोटी माहिती देत पोलिसांना बोलावले
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन शिंदे याने आपल्या मोबाईलवरून डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. यावेळी एका व्यक्तीला गोळी मारून त्याचा खून करण्यात आला असून घटना सुरू असल्याची माहिती त्याने दिली. या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस नियंत्रण कक्षाने तातडीने संबंधित पोलीस ठाण्याचे वाहन घटनास्थळी रवाना केले.
मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधित व्यक्तीने दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली.
भारतीय न्याय संहिता कलम २१२ अन्वये गुन्हा
शासकीय कर्मचाऱ्यांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे आणि आपत्कालीन पोलीस यंत्रणेचा वेळ वाया घालविल्याप्रकरणी मोहन शिंदे याच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
खोटे कॉल करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
डायल ११२ ही सेवा संकटात सापडलेल्या नागरिकांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी २४ तास कार्यरत असते. या क्रमांकावर विनाकारण, करमणुकीसाठी किंवा खोडसाळपणे खोटे कॉल केल्यामुळे पोलिसांचा वेळ वाया जातो आणि प्रत्यक्ष संकटात असलेल्या नागरिकांना मदत मिळण्यास विलंब होऊ शकतो.
त्यामुळे नागरिकांनी डायल ११२ या आपत्कालीन सेवेचा जबाबदारीने वापर करावा. खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी दिला आहे.




























