पुणे,दि.०८ :- ‘स्वच्छता ही सेवा 2026’ अभियानांतर्गत कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ श्रमदान अभियान राबविण्यात आले. सेवन लव्हज चौक ते संत कबीर चौक ते मालधक्का मेन रोड परिसरात झालेल्या या स्वच्छता मोहिमेत महापालिका अधिकारी-कर्मचारी, सफाईसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा भाग म्हणून दि. 1 ऑक्टोबर रोजी ही मोहीम घेण्यात आली. उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संतोष वारुळे, उप आयुक्त (परिमंडळ क्र. 5) माधव जगताप आणि महापालिका सहायक आयुक्त तिमय्या जगले यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी सहायक आयुक्त तिमय्या जगले, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक, मुकादम, सफाईसेवक, स्वच्छ संस्था, SV Union, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला. सामूहिक सहभागातून स्वच्छ आणि सुंदर परिसर निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.




























