पुणे,दि.१८ : श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, शिरगाव यांच्या वतीने रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी आयोजित प्रति शिर्डी श्री साईबाबा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातून सकाळी १० वाजता पालखीचे भव्य प्रस्थान झाले. यावेळी साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेतले.
पालखी सोहळ्याची सुरुवात सकाळी ७ वाजता रासणे मंदिर, तोफखाना येथे श्री साईबाबांच्या पादुकांच्या महाअभिषेकाने झाली. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाअभिषेक व महाआरती करण्यात आली. धार्मिक वातावरणात आणि साईनामाच्या जयघोषात पालखीचे प्रस्थान झाले.
यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी,सुनील रासने,प्रसिद्ध उद्योगपती कृष्णकुमार गोयल, डॉ पराग काळकर,राम शिंदे,संपत भोसले,श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यकारी विश्वस्त सौ. विभावरी देवळे जाधव, तहहयात विश्वस्त श्री. रवी जाधव यांच्यासह साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालखी मिरवणुकीत आकर्षक पालखी रथ, प्रभात बँड, गंधर्व बँड आणि ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते. तसेच बाल वारकरी, महिला व पुरुष वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बँडचे सुरेल स्वर, ढोल-ताशांचा गजर आणि साईनामाच्या जयघोषामुळे संपूर्ण मिरवणुकीत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. वारकऱ्यांच्या सहभागामुळे पालखी मिरवणुकीला विशेष शोभा प्राप्त झाली.
पालखी मिरवणूक बेलबाग चौक, लक्ष्मी रोड, अलका टॉकीज, संभाजी पूल, फर्ग्युसन रोड, ज्ञानेश्वर पादुका चौक, वडारवाडी, ओम सुपर मार्केट आणि सिंबायोसिस कॉलेज परिसरातून मार्गक्रमण करीत पुढे रवाना झाली. या मार्गावर ठिकठिकाणी साईभक्तांनी पालखीचे दर्शन घेतले.
सिंबायोसिस कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस. बी. मुजुमदार,सौ स्वाती मुजुमदार व त्यांच्या परिवाराच्या हस्ते मध्यान्ह आरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील धार्मिक कार्यक्रमानंतर पालखी प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगावच्या दिशेने मार्गस्थ झाली.
दरम्यान, मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी शिरगाव येथे विजयादशमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ७ वाजता महाअभिषेक, त्यानंतर मध्यान्ह आरती व भजन सेवा, सायंकाळी ६.१५ वाजता धूप आरती आणि सायंकाळी ६.४५ ते ७.३० या वेळेत पालखी प्रदक्षिणा होणार आहे.
पुण्यातून प्रति शिर्डी शिरगावकडे मार्गस्थ झालेल्या या पालखी सोहळ्यामुळे शहरातील साईभक्तांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, शिरगाव यांच्या वतीने सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व साईभक्तांचे आभार व्यक्त करण्यात आले.




























