पुणे, दि.. १८ : -‘ऐलमा पैलमा गणेश देवा…’, ‘एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबू झेलू…’ अशा पारंपरिक भोंडल्याच्या गाण्यांवर फेर धरताना आजीबाईंची पावले पुन्हा बालपणात रमली. झिम्मा, फुगड्या आणि गाण्यांच्या साथीने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
काहींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, तर काहींचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले. निमित्त होते, चतु:शृंगी मंदिर परिसरात आयोजित निवारा वृद्धाश्रमातील महिलांच्या भोंडल्याचे.
नवरात्रोत्सवानिमित्त सुयोग मित्र मंडळ (ट्रस्ट), गोखलेनगर आणि चतु:शृंगी देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या आजीबाईंनी भोंडल्याची गाणी म्हणत फेर धरला. वयाचे भान विसरून झिम्मा-फुगड्यांचा आनंद लुटला. अनेक वर्षांनंतर बालपणीच्या सवंगडी, माहेरच्या आठवणी आणि सणासुदीच्या प्रसंगांना उजाळा मिळाल्याने वातावरण भावूक झाले.
कार्यक्रमाच्या समारोपानंतरही आजीबाईंच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. भोंडल्याच्या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा बालपण अनुभवता आले. रंजना कानिटकर, कमल कनगुटकर, सुनीता मांडवकर, नंदा मोहिते आणि प्रमिला मयेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
भोंडला हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील महिलांचा पारंपरिक उत्सव आहे. हस्त नक्षत्राच्या काळात हत्तीच्या प्रतिमेभोवती फेर धरून गाणी म्हणण्याची परंपरा आहे. स्त्रियांचा स्नेह, सामूहिक आनंद आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या परंपरेतून वृद्धाश्रमातील महिलांना आनंदाचे क्षण मिळावेत, एकटेपणाची भावना दूर व्हावी आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळावा, हा उपक्रमाचा उद्देश होता.



























