पुणे,दि. १९: पुणे शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात पुणे महानगरपालिकेने बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) धडक कारवाई केली. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या वतीने शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत तब्बल ५० हजार ७०० चौरस फूट अनधिकृत कच्चे-पक्के बांधकामे निष्कासित करण्यात आली.
उप आयुक्त सोमनाथ बनकर आणि उप आयुक्त अविनाश सकपाळ यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये नगररोड-वाघोली, शिवाजीनगर-घोले रोड, सिंहगड रोड, हडपसर-मांजरी तसेच कसबा पेठ-विष्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील विविध ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
नगररोड-वाघोली क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विमाननगर, साकोरेनगर, दत्त मंदिर चौक, साकीनगर हॉटेल लेन आणि सीसीडी चौक परिसरात कारवाई करण्यात आली. शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील जंगली महाराज मंदिर खाऊ गल्ली, फर्ग्युसन कॉलेज रोड आणि हाँगकाँग लेन परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
कसबा पेठ-विष्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत शिवाजी रोड, बाजीराव रोड, शनिवार पेठ, शनिवारवाडा, वसंत सिनेमा, फरासखाना चौक, कोतवाल चावडी, श्रीनाथ सिनेमा, रामेश्वर चौक आणि गाडीखाना परिसरातही कारवाई करण्यात आली.
या संपूर्ण मोहिमेत अनधिकृत व्यावसायिकांचे एक स्टॉल, चार हातगाड्या, ५५ पथाऱ्या, ३० सिलिंडर आणि ५९ इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच जंगली महाराज रोडवरील हाँगकाँग लेनमधील पुणे महापालिकेमार्फत देण्यात आलेले ५७ स्टॉल अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे सील करण्यात आले.
या कारवाईसाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी, पुणे महानगरपालिका पोलीस अधिकारी व कर्मचारी, एमएसएफ जवान, जेसीबी, गॅसकटर आणि बिगारी सेवकांची मदत घेण्यात आली.



























