पुणे,दि.१७ :- राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाने बनावट देशी-विदेशी मद्याची वाहतूक व साठवणुकीविरोधात मोठी कारवाई करत एकूण ४ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दौंड व इंदापूर तालुक्यात करण्यात आलेल्या या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दौंड तालुक्यातील बोरीबेल गावाजवळ एका कारमधून बनावट देशी दारूच्या ३२०० सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच इंदापूर तालुक्यातील रेणुगी गावात छापा टाकून बनावट देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या, बनावट लेबले आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. पुढील तपासात आरोपींच्या घरातूनही मोठ्या प्रमाणात बनावट मद्यसाठा आढळून आला.
या कारवाईत बनावट मद्यनिर्मिती व विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, वाहन आणि मद्यसाठा असा एकूण ४.६९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास संबंधित हेल्पलाइनवर कळविण्याचे आवाहन केले आहे.



































