पिंपरी, दि. ८ :- “रामकृष्ण हरी” च्या जयघोषात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज पिंपरी-चिंचवड नगरीत भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण आगमन झाले. निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात महानगरपालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पालखी सोहळा प्रमुख, तसेच वीणेकरांचा सत्कार करून त्यांचे नगरीत भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने पालखी सोहळ्यात सहभागी प्रत्येक दिंडीला आरोग्य किटचे (प्रथमोपचार पेटी) वाटप करण्यात आले तसेच पर्यावरण वृध्दीसाठी देशी बियाणांच्या पाकीटाचेही वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार अमित गोरखे, उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर,नगरसदस्य अमित गावडे,विठ्ठल उर्फ नाना काटे,राहूल कलाटे,उत्तम केंदळे,अनिल घोलप,निलेश नेवाळे,धर्मपाल तंतरपाळे,गायकवाड, निखिल बो-हाडे, प्रविण भालेकर, नगरसदस्या संगिता ताम्हाणे,आशा सुर्यवंशी, शिवानी नरळे,ऐश्वर्या तरस,रेश्मा कातळे,नीलेश तरस, माजी नगरसदस्य मारूती भापकर,सचिन चिखले,तसेच सचिन सानप,महापालिका अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम,तृप्ती सांडभोर,उप आयुक्त अण्णा बोदडे,डाॅ.प्रदीप ठेंगल,क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्थापत्य, विद्युत, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा,जनता संपर्क, अग्निशमन तसेच इतर सर्व संबंधित विभागांनी व्यापक नियोजन केले असून वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी सतत कार्यरत होते. वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मुक्कामस्थळे, आरोग्य सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था, अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन सेवा याबाबत विशेष दक्षता घेण्यात आली आहे तसेच पालखी स्वागत कक्षातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर लगेचच आरोग्य विभागामार्फत रस्त्याची स्वच्छता करण्यात आली.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या आगमनाने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर आनंदी,उत्साहीत झाले असून नागरिक आणि भाविकांनी मोठ्या उत्साहाने पालखीचे दर्शन घेत विठ्ठलनामाचा गजर केला.




























