पुणे : श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या वतीने आयोजित पुणे ते श्री क्षेत्र शिर्डी या पायी पालखी सोहळ्याला आज उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. यंदाचा हा पालखी सोहळा ३८व्या वर्षात पदार्पण करत आहे.
राजयोगिनी ब्रह्मकुमारी नलिनी दीदीजी, पूजा विनय शेठ, आमदार हेमंत रासने, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, समितीचे अध्यक्ष रमेश भोसले, कार्याध्यक्ष किरण कदम, सचिव मंदार शहाणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडला.
यापूर्वी पहाटे साई पादुकांना मंगल स्नान व अभिषेक प्रांजल आणि सुदीप छल्लाने यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यानंतर कसबा गणपती येथून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. फडके हौद, दारूवाला पूल, रास्ते वाडा, पंधरा ऑगस्ट चौक, नरपतगिरी चौक, पुणे स्टेशन, बंडगार्डन आणि नगर रोड मार्गे पालखीने श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान केले.
आज पालखीचा मुक्काम वाघोली येथे असणार असून उद्या ती पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे. गुरु पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पालखी श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहोचणार आहे.
या पालखी सोहळ्याद्वारे धर्म, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि व्यसनमुक्तीचा संदेश दिला जात आहे. तसेच “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
बळीराजा सुखी आणि समाधानी व्हावा यासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. “चांगला पाऊस पडून उत्तम पीक यावे, कारण भारताची प्रगती निसर्गावर अवलंबून आहे,” असे सांगत समितीचे अध्यक्ष रमेश भोसले यांनी यंदा निसर्ग पूजन आणि संवर्धनाचा संकल्प केल्याचे स्पष्ट केले.


























