पुणे: “प्रतिकूल परिस्थितीतही शिवसैनिकांच्या निष्ठेच्या जोरावर शिवसेना खंबीरपणे उभी आहे. शिवसेनेचा जन्मच आंदोलनातून झाला असून, काही जण पक्ष सोडून गेले तरी शिवसेना कधीही संपणार नाही,”असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते तथा पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी केले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या माजी पुणे शहरप्रमुखांना ‘मातोश्री निष्ठा पुरस्कार’ तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना ‘युवा प्रेरणा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला पक्षाचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, महिला आघाडी संपर्क समन्वयक मेघना माने, महापालिका गटनेते नगरसेवक नितीन गायकवाड, शहरप्रमुख वसंत मोरे, अशुतोष मोकाशी, मकरंद पेटकर, प्रशांत राणे, प्रकाश धामणे, रमेश जुनवणे, हेमंत कांबळे, प्रभाकर कुंटे, संजय गवळी आदी उपस्थित होते. उपशहर संघटक उमेश वाघ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी रमेश बोडके, रामभाऊ पारीख, नाना वाडेकर, महादेव बाबर, संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांना ‘मातोश्री निष्ठा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच जयश्री काळे, नितीन भुजबळ, सुरेश कोते, विक्रम गायकवाड, जितेंद्र जोशी, सचिन वडघुले, निखिल जाधव, अनिल येनपुरे आणि राम घाईतिडक यांना ‘युवा प्रेरणा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी शहरातील अनेक जुने शिवसैनिक, व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
———————
मराठी अस्मितेचा आवाज म्हणजे शिवसेना–
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि वारसा पुढे नेण्याचे काम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. मराठी अस्मितेचा बुलंद आवाज म्हणून शिवसेनेची ओळख कायम आहे. प्रत्येक शिवसैनिकाने पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी निष्ठेने काम करावे, असे आवाहन नितीन बानुगडे-पाटील यांनी केले.




























