पिंपरी-चिंचवड,दि.०८ :- नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने पोलीस सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सांगवी विभागासाठी स्वतंत्र सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. या नव्या कार्यालयाचे उद्घाटन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनानुसार सांगवी विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ
करण्याच्या उद्देशाने हे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी पोलीस आयुक्तांनी कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांना शुभेच्छा देत नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा देण्याच्या दृष्टीने कार्यक्षमतेने व समर्पित भावनेने काम करण्याचे निर्देश दिले.
नवीन कार्यालयामुळे आधुनिक सुविधा, सुटसुटीत कार्यालयीन वातावरण आणि अद्ययावत कार्यप्रणालीच्या माध्यमातून नागरिकाभिमुख पोलीस सेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
उद्घाटन समारंभाला पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) सारंग आवाड, पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव, पोलीस उपायुक्त मारुती जगताप, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, पोलीस उपायुक्त (वाहतूक) धीरज पाटील, पोलीस उपायुक्त विशेष शाखा प्रशांत ढोले, सांगवी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त मनिषा कदम, तसेच परिमंडळ-१ मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सांगवी विभागातील कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
या नव्या कार्यालयामुळे सांगवी विभागातील नागरिकांच्या तक्रारी व समस्या अधिक प्रभावीपणे हाताळण्यास तसेच पोलीस प्रशासन आणि नागरिकांमधील समन्वय अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.



























