पिंपरी,दि.२५ :- पिंपरी परिसरातील रिव्हर रोड येथील पीएमपीएमएल स्टॉपजवळील शक्ती कॉस्मेटिक्स या दुकानात भारतात विक्रीस परवानगी नसलेली ‘Made in Pakistan – Goree Beauty Cream’ विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने (ATB) कारवाई केली.
दहशतवाद विरोधी शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने शक्ती कॉस्मेटिक्स या दुकानात छापा टाकण्यात आला. यावेळी दुकानातील आरोपी प्रकाश मनोहरलाल गुरु (वय ३९, रा. बॉम्बे स्टँडजवळ, गेलाई चौक, पिंपरी) हा भारतात विक्री करण्यास प्रतिबंधित असलेली ‘Made in Pakistan – Goree Beauty Cream’ विक्री करत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी दुकानातून २३ नग क्रीम जप्त केली असून, प्रत्येकाची किंमत ५५० रुपये आहे. जप्त मालाची एकूण किंमत १२ हजार ६५० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी ‘Goree Beauty Cream’ कंपनीचे भारतातील अधिकृत तपासणी अधिकारी रईसुद्दीन इनामदार यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह कॉपीराइट कायद्याच्या कलम ५१ व ६३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत केणे करीत आहेत.
दरम्यान, भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार पाकिस्तानातून भारतात सर्व प्रकारच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ‘Made in Pakistan’ असा उल्लेख असलेली कोणतीही वस्तू विक्रीसाठी आढळल्यास नागरिकांनी तात्काळ दहशतवाद विरोधी शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, तसेच पोलीस उपायुक्त विशेष शाखा धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.




























