पुणे : कोथरूडमधील गणेश कॉलनी, बधाई परिसरातील गणंजय सोसायटी भागात मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी दोन ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णकला बिल्डिंग परिसरातील धावडे यांच्या इमारतीत चोरट्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवळच असलेल्या तोरडमल यांच्या चौकातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचे कुलूप चोरट्यांनी तोडले.
कुलूप तोडल्यानंतर चोरट्यांनी फ्लॅटमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने त्यांच्या हाती कोणताही मौल्यवान ऐवज लागला नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, घराचे दरवाजे, खिडक्या तसेच इमारतीच्या प्रवेशद्वारांची सुरक्षितता तपासावी. परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याची कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे.



























