पुणे,दि.२० :- रात्रीच्या वेळी पुणे-नगर रस्त्यावरून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी एका नागरिकाला शिवीगाळ व मारहाण करून जबरी चोरी केली होती. या प्रकरणातील एका आरोपीला येरवडा पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून जेरबंद केले आहे. रेहान अश्रफ शेख (वय २१, रा. लोहगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या घटनेत आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून त्याच्याकडील सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, २ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि २९ हजार ६०० रुपये रोख रक्कम, असा एकूण ५८ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला होता. याप्रकरणी ९ नोव्हेंबर २०२६ रोजी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश पालवे, नटराज सुतार व संदीप जायभाये यांनी घटनास्थळासह परिसरातील सुमारे ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला.
आरोपी काळवड वस्ती, लोहगाव परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या राहत्या पत्त्यावर जाऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची
कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून फिर्यादींचा चोरीस गेलेला २० हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करीत आहेत
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.




























