पुणे,दि. १९ :- पुणे शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पुणे महानगरपालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. कोथरूड येथील सिटी प्राईड परिसरातील अनधिकृत बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईची महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या वेळी इमारतीच्या फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन तसेच खासगी जागेतील नियमबाह्य बांधकामांवर करण्यात येत असलेल्या संयुक्त कारवाईचा आयुक्तांनी आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाईची सविस्तर माहिती जाणून घेत आवश्यक सूचना दिल्या.
शहरात अनेक ठिकाणी बांधकाम नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकामे केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अशा बांधकामांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. बांधकाम नियमांचे काटेकोर पालन व्हावे, सार्वजनिक तसेच खासगी जागांवरील नियमबाह्य बांधकामांना प्रतिबंध व्हावा आणि उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई व्हावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे, बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक ६ चे अधिकारी तसेच वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



























