पुणे, २६ :- शहरात पाणीकपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर पाच दिवसात १ हजार १४४ तक्रारी आल्या असून, त्यातील ४३७ तक्रारींचे निवारण केल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. दरम्यान अद्याप ६९२ तक्रारी प्रलंबित असून, येत्या दोन दिवसांत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.
भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अल्-निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यताही वर्तविली आहे. यंदाचा पावसाळा सुरू झाला आहे. मात्र, एकदाही पाऊस पडलेला नाही. त्यातच खडकवासला धरण साखळीत केवळ ५.०३ टीएमसी पाणी
शिल्लक असून, त्यापैकी सुमारे ३ टीएमसी पाणी पुणे शहरासाठी उपलब्ध आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणी वापरावर निर्बंध घालून २५ टक्के पाणी बचत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून (१५ मे) शहराच्या विविध भागात सम व विषम तारखेनुसार पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे शहराच्या विविध भागात पाणी पुरवठा विस्कळीत होत असून महापालिकेच्या सर्वच पाणीपुरवठा केंद्रात या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सर्वाधिक तक्रारी या लष्कर आणि एसएनडीटी पाणीपुरवठा जलकेंद्रांतर्गत प्राप्त झाल्या आहेत. क्षेत्रीय कार्यालयामार्फत ही भरारी पथके नेमण्यात आली आहेत.




























