पुणे, दि.१८ :- प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पर्यावरण सायकल वारीची सुरुवात २६ जून रोजी पहाटे १ वाजता शिवाजीनगर येथील पुणे महानगरपालिका मुख्य इमारतीतून झाली.
वारीदरम्यान इंदापूर येथील गुरुकुल कॉलेजमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदायातील कीर्तनकार तसेच गुरुकुल कॉलेजचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या सायकल वारीत पुणे महानगरपालिकेचे ८६ सेवक सहभागी झाले. त्यांनी सुमारे २३० किलोमीटरचे अंतर पूर्ण करत सायंकाळी ७ वाजता पंढरपूर येथे यशस्वीरित्या आगमन केले. विशेष म्हणजे, या उपक्रमात महानगरपालिकेचे काही निवृत्त सेवकही उत्साहाने सहभागी झाले होते.
पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली आणि वारकरी परंपरेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सायकल वारीला सहभागींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




























