पुणे, १२ मार्च २०२६: महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेडने (MNGL) आपल्या घरगुती ग्राहकांना स्वयंपाकाच्या गरजांसाठी अखंडित ‘पाईप्ड नॅचरल गॅस’ (PNG) पुरवठा मिळत राहील, याबाबत आश्वस्त केले आहे. तसेच, भारत सरकारच्या निर्देशानुसार, घरगुती वापरासाठी १००% नैसर्गिक वायूचे वाटप केल्याने पुणे आणि आसपासच्या भागातील रहिवाशांना पुरवठ्यात कोणतीही अडचण किंवा टंचाई भासणार नाही, याची देखील कंपनीने खात्री दिली आहे.
मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक स्तरावर ‘लिक्विफाइड नॅचरल गॅस’ (LNG) च्या वाहतुकीत अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (MoPNG) नागरिकांना दैनंदिन वापरासाठी गॅस उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. ‘नॅचरल गॅस (सप्लाय रेग्युलेशन) ऑर्डर, २०२६’ अंतर्गत ९ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे हे आदेश तात्काळ लागू करण्यात आले आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार, घरगुती पीएनजी ग्राहक आणि वाहतुकीसाठीचा सीएनजी पुरवठा हे एमएनजीएलचे सर्वोच्च प्राधान्य क्षेत्र आहे. पुणे महानगरपालिका (PMC) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) परिसरात आठ हजार इंच-किलोमीटरचे पाइपलाइन जाळे आणि १२५ हून अधिक सीएनजी स्थानकांसह एमएनजीएलची पायाभूत सुविधा भक्कम आहे. सध्या कंपनीचे ८ लाख घरगुती कनेक्शन आणि ५.५० लाखांहून अधिक सीएनजी वाहनांची गरज पूर्ण करण्यास सक्षम आहे.
पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या (PNGRB) पाठिंब्याने, MNGL ‘नॅशनल पीएनजी ड्राईव्ह २.०’ (National PNG Drive 2.0) अंतर्गत पीएनजीच्या वापराला सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे. हा एक देशव्यापी उपक्रम असून निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये पाईप नॅचरल गॅसचा वापर वाढवणे, हा याचा उद्देश आहे. हा उपक्रम नैसर्गिक वायूचा वाटा ६% वरून १५% पर्यंत वाढवण्याच्या भारत सरकारच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, एमएनजीएल घरगुती आणि व्यावसायिक क्षेत्रांना पीएनजीकडे वळण्यासाठी प्रयत्नशील आहे.
त्यामुळे, इच्छुक ग्राहकांनी नवीन कनेक्शनच्या नोंदणीसाठी आणि आधिक माहितीसाठी dpngconnect@mngl.in वर संपर्क साधावा. किंवा, “My MNGL” ॲप डाउनलोड करून अथवा १८०० २६६ २६९६ या क्रमांकावर संपर्क करून किंवा mngl.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
दरम्यान, पीएनजी हे सर्वात स्वच्छ आणि सुरक्षित स्वयंपाकाचे इंधन म्हणून ओळखले जात असून, नैसर्गिकरित्या सुरक्षित आहे. त्यासोबतच हे किफायतशीर आणि सोयीस्कर असून सिलेंडरची गरज नसल्यामुळे किचनमधील जागेचीही बचत होते. याव्यतिरिक्त, सध्याच्या कठीण काळात, पीएनजी हे एक विश्वासार्ह आणि सोयीचे इंधन आहे, असेही कंपनीने नमुद केले आहे.
“केंद्र सरकारने घरगुती वापरासाठी १००% नैसर्गिक वायूचे पुरवठ्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे घरगुती ग्राहकांना त्यांच्या स्वयंपाकाच्या गरजांसाठी पीएनजी (PNG) पुरवठा अखंडित सुरु राहील.
घरगुती वापरासाठीच्या नैसर्गिक वायू पुरवठ्यात कोणतीही अडचण किंवा टंचाई नाही.”
सुजित रुईकर
उपाध्यक्ष (मार्केटिंग)
MNGL









