पुणे, दि. १७ जुलै : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत प्रत्येक पात्र मतदाराने आपले गणना पत्र (एन्युमरेशन फॉर्म) वेळेत भरून संबंधित बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
मंत्री पाटील यांनी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत स्वतःचे गणना पत्र भरून ते संबंधित बीएलओकडे सुपूर्द केले. यावेळी त्यांनी नागरिकांनीही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी. पाटील म्हणाले, “मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा पाया आहे. हा अधिकार प्रभावीपणे बजावता यावा यासाठी मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि त्रुटीरहित असणे आवश्यक आहे. विशेष सखोल पुनरीक्षण ही मतदार यादी शुद्धीकरणाची महत्त्वपूर्ण प्रक्रिया असून, प्रत्येक पात्र मतदाराने ३० जुलैपूर्वी आपले गणना पत्र भरून संबंधित बीएलओकडे जमा करावे.”
ते पुढे म्हणाले, “मतदार यादीतील माहिती अद्ययावत राहिल्यास निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि प्रभावी होते. त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा गैरसमजांना बळी न पडता भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रांसह गणना पत्र भरून ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.”
यावेळी त्यांनी दर सहा वर्षांनी होणाऱ्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देत, पात्र पदवीधर आणि शिक्षक मतदारांनीही आपली नावे मतदार यादीत नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

























