बारामती,१७ : – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ जुलै २०२६ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘अमृत भारत स्टेशन योजने’अंतर्गत देशभरातील पुनर्विकसित ७५ रेल्वे स्थानके राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील बारामती रेल्वे स्थानकाचाही समावेश असून, ११.४० कोटी रुपये खर्चून या स्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील महत्त्वाच्या स्थानकांपैकी असलेल्या बारामती स्थानकावर दररोज सुमारे १,८०० प्रवासी ये-जा करतात तसेच येथे आठ प्रवासी गाड्यांची सेवा उपलब्ध आहे. स्थानकाचा पुनर्विकास करताना परिसराचे स्थानिक वैशिष्ट्य जपत प्रवाशांच्या सुविधा आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे.
पुनर्विकसित बारामती स्थानकात आकर्षक आणि आधुनिक वास्तुकलेची इमारत, आधुनिक प्रतीक्षा कक्ष, सुधारित प्रकाशयोजना, प्रमाणित फलक, स्वच्छता सुविधा, दिव्यांग प्रवाशांसाठी अडथळामुक्त प्रवेश, उत्तम पार्किंग व्यवस्था आणि स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी सुधारित रस्ते यांसारख्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
बारामती हे राज्यातील प्रमुख कृषी, औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र असून सहकारी साखर उद्योग, दुग्धव्यवसाय, द्राक्ष लागवड आणि अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी ओळखले जाते. तसेच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठीही बारामती महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
‘अमृत भारत स्टेशन योजने’अंतर्गत देशभरातील १,३३७ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील १३२ स्थानकांचा समावेश आहे. यापैकी १५ स्थानके यापूर्वीच पुनर्विकसित करून राष्ट्राला समर्पित करण्यात आली असून उर्वरित स्थानकांचे काम वेगाने सुरू आहे.
या योजनेद्वारे भारतीय रेल्वे आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत विकास, सुलभता आणि प्रादेशिक वारसा यांचा संगम साधत रेल्वे स्थानकांचे भविष्योन्मुख प्रवेशद्वारांमध्ये रूपांतर करत आहे.



























