पुणे,दि.२२ : – लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत ‘स्वच्छता सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. महापौर व महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार या अभियानात शहरभर विविध स्वच्छता व जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
स्वच्छता सप्ताहाचा शुभारंभ सिंहगड रस्त्यावरील श्री विठ्ठल मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहिमेद्वारे करण्यात आला. या आठवड्यात सार्वजनिक रस्ते, वाहतूक केंद्रे, बसस्थानके, रेल्वे स्थानके, शाळा, बाजारपेठा, शासकीय इमारती, झोपडपट्ट्या, नद्या-नाले, तलाव तसेच सार्वजनिक शौचालयांची विशेष स्वच्छता केली जाणार आहे. यासोबतच आरआरआर (Reduce-Reuse-Recycle) केंद्रांवर ई-कचरा, प्लास्टिक, फर्निचर व अन्य निरुपयोगी वस्तू संकलन मोहीमही राबविण्यात येणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला महापौर मंजुषाताई नागपुरे, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, अतिरिक्त महापालिका आयुक्त, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध सामाजिक संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेत सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला असून सुमारे ३ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. नागरिकांनी स्वच्छता सप्ताहात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.




























