पुणे-चिंचवड, दि.21 :– पुणे पिंपरी चिंचवड च्या वाहतुकीचे अराजक आणखी वाढवणाऱ्या बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचे धोरण शासन घेत आहे. रिक्षा चालकांच्या आधीच अर्ध्या झालेल्या भाकरीत बाईक टॅक्सी वाटेकरी होत आहे.सध्या दुचाकी वरून म्हणजे बाईक टॅक्सीवरून प्रवासी वाहतुकीची परवानगी नसली तरी त्याला आळा घालण्याची प्रशासनाची इच्छाशक्ती नाही. या बाबत वारंवार मागणी करूनही बाईक टॅक्सी धोरण रद्द करण्यास शासन तयार नाही. त्यामुळे या प्रश्नी दाद मागण्यासाठी राज्य शासन ज्यांच्या आधारावर उभे असते त्या आमदारांच्या कार्यालयावर निदर्शने करण्याचा निर्णय रिक्षा पंचायत व मित्र संघटनांनी घेतला आहे. त्याची सुरुवात परिवहन विभागाचा राज्यमंत्री म्हणून कारभार पाहणाऱ्या,आणि पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ व पिंपरीचे आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोड यांच्या कार्यालयावर सोमवारी 23 नोव्हेंबर, सकाळी अकरा वाजता निदर्शने करून होणार आहे.
राज्य शासनाने दुचाकीवरून प्रवासी सेवे( बाईक टॅक्सी )ला परवाना देण्याची भूमिका चार वर्षांपूर्वी घेतली होती. शासनाचे सर्व प्रकारचे नियमन नियंत्रण असलेल्या विमा,योग्यता प्रमाणपत्र,निश्चित भाडे दर,वाहन रंग, गणवेश इ ची जबाबदारी असलेल्या ऑटो रिक्षा हे वाहन चालविणाऱ्या रिक्षा चालकांच्या भाकरीतील वाटेकरी या पैकी कसलीच जबाबदारी नसलेल्या खाजगी दुचाकी मुळे निर्माण होणार आहेत. सन २०२२ ला काही रिक्षा संघटनांनी या निर्णयाविरुद्ध पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यात त्यांना अटक झाली.दरम्यान रिक्षा पंचायत पुणे पिंपरी चिंचवड ने बाईक टॅक्सी विरुद्ध मा. उच्च आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. मा उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने बाईक टॅक्सीला परवानगी नाकारली. मात्र याबाबतचे धोरण तयार करायला शासनाला सांगितले. धोरण तयार करण्यासाठी माजी सनदी अधिकारी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती शासनाने नेमली. तिच्यासमोरही रिक्षा पंचायतीने वरील भूमिका मांडली .त्याची दाखल घेऊन शासनाच्या ‘ झा समिती’ नेही महानगरांमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी न देता केवळ दुर्गम भागातच बाईक टॅक्सीला परवानगी देण्याची शिफारस केली.
तरीही आता पुन्हा एकदा नव्याने बाईक टॅक्सीला परवानगी देण्याची भूमिका शासन घेत आहे. त्यामुळे, याबाबत राज्य सरकार ज्यांना जबाबदार असते त्या आमदारांच्या कार्यालयावर निदर्शने करून बाईक टॅक्सी कायमची हद्दपार करावी. आणि याबाबत परवानगी देणारे धोरण पूर्णपणे रद्द करावे.असे गाऱ्हाणे विधिमंडळ सदस्यांसमोर मांडला जाईल.निदर्शन काळात पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील रिक्षा बंद असणार आहेत.या निदर्शनात रिक्षा पंचायत सह आझाद रिक्षा संघटना, छावा वाहन चालक कामगार संघ या संघटना सहभागी होणार आहेत.



























