पिंपरी-चिंचवड,दि.२६ : – अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दिनेश बाबुराम चौधरी (वय २८) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष न्यायाधीश एस. एन. यादव यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७५(१) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) कलम ८, १० व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.दि. ८ एप्रिल २०२६ रोजी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी सपोनि मनिषा दशवंत यांनी अवघ्या ३० दिवसांत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. खटल्याची जलदगतीने सुनावणी घेण्याची विनंती अभियोग पक्षातर्फे करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी निकाल दिला.
न्यायालयाने सुनावलेली शिक्षा :
भारतीय न्याय संहिता कलम ७५(१) अन्वये २ वर्षे कारावास व २ हजार रुपये दंड.
पोक्सो कायदा कलम ८ अन्वये ३ वर्षे कारावास व २ हजार रुपये दंड.
पोक्सो कायदा कलम १० अन्वये ५ वर्षे कारावास व २ हजार रुपये दंड.
पोक्सो कायदा कलम १२ अन्वये २ वर्षे कारावास व २ हजार रुपये दंड.
वरील सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या असल्याने आरोपीला एकूण पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. स्मिता चोगुले यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी बाजू मांडली. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म. पोहवा संगीता सरसे यांनी न्यायालयीन कामकाजात समन्वय साधला.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त परि-३ मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार व पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांत जलद तपास आणि प्रभावी न्यायालयीन पाठपुराव्यामुळे आरोपीला शिक्षा मिळाली आहे.



























