पुणे,दि.१७ :- विश्रांतवाडी चौक येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रेड सेपरेटर/उड्डाणपुलाच्या कामासाठी ६०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम पुणे महानगरपालिकेमार्फत १८ जून २०२६ रोजी करण्यात येणार आहे. या कामामुळे विश्रांतवाडी परिसरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
गणेशनगर, कल्याण, म्हस्के वस्ती, जाधव वस्ती, पाखरवाडी, चव्हाणवाडी, संजय पार्क, वायरांगळ, विमाननगरचा काही भाग, विश्रांतवाडीतील एअरपोर्ट रस्त्यालगतचा परिसर तसेच नगर रोडवरील काही भाग आणि परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.
दरम्यान, १७ व १९ जून रोजी संबंधित भागात नियमित पाणीपुरवठा होणार असून २० जूनपासून पुन्हा सम-विषम तारखेनुसार पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


































