पुणे,दि.१७ :- पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने सिंहगड रोड परिसरात मोठी कारवाई करत दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून १ लाख २१ हजार रुपये किमतीची ३ पिस्तुले आणि ५ जिवंत काडतुसे जप्त केली. वडगाव पठार येथे संशयित इसम शस्त्रांसह थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.
पोलिसांनी प्रमेश पंकज देवसाई (वय २१) आणि अनिकेत आनंद केंद्रे (वय २७) यांना ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्यांच्याकडून बेकायदेशीर शस्त्रे व काडतुसे आढळून आली. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गोहर हसन व सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित जाधव आणि त्यांच्या पथकाने केली.



































