पुणे,दि.१७ :- पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक-२ ने मोठी कारवाई करत तब्बल १५ गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. सोहेल जावेद शेख (रा. बिराजदार नगर, हडपसर) याला गुप्त माहितीच्या आधारे हडपसर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
विश्रामबाग पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यात तो फरार होता. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने संबंधित गुन्ह्यांची कबुली दिली. तपासात आरोपीवर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १५ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तसेच त्याच्यावर शारीरिक दुखापत व मालमत्तेसंबंधी एकूण ५० गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त गोहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या सूचनेनुसार खंडणी विरोधी पथक-२ चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.



































