पुणे,दि.१७ :- पुणे शहरातील ताडीवाला रोड परिसरात विनापरवाना नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका आरोपीला अमली पदार्थविरोधी पथक-१ ने अटक केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत आरोपीच्या घरावर छापा टाकून Dicyclomine Hydrochloride, Tramadol Hydrochloride आणि Acetaminophen Capsules या औषधांचे ७३ बॉक्स व एकूण १०,५१२ कॅप्सूल जप्त करण्यात आले.
या कारवाईत सुमारे ५२५ ग्रॅम ट्रामाडोलयुक्त प्रतिबंधित औषधे जप्त करण्यात आली असून त्याची किंमत सुमारे ६८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखेने ही यशस्वी कारवाई केली. आरोपीकडून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या बेकायदेशीर विक्रीच्या साखळीबाबत पुढील तपास सुरू आहे.



































