पुणे,दि.२५ : जीबीएस (गिलियन-बॅरे सिंड्रोम) आजाराच्या पार्श्वभूमीवर नव्याने समाविष्ट १२ गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित ८९० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाला गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला पर्यावरण व सामाजिक परिणाम मूल्यांकन (ईएसआयए) अहवाल तयार करण्यासाठी ‘डिलॉईट टच तोहमात्सू इंडिया एलएलपी’ या संस्थेची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली असून ३६.३२ लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ३२ गावांपैकी नांदेड, किरकीटवाडी, नांदोशी, नऱ्हे, सणसनगर, खडकवासला, धायरी, जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, गुजर निंबाळकरवाडी आणि भिलारेवाडी या १२ गावांमध्ये जानेवारी २०२५ मध्ये जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला होता. बाधित रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे याच परिसरातील असल्याने दूषित पाणीपुरवठा हा संभाव्य कारणांपैकी एक असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले होते.
सध्या या १२ गावांना दररोज सुमारे ४७.५० एमएलडी विना-प्रक्रिया क्लोरीनयुक्त पाणीपुरवठा केला जात असून पिण्यासाठी स्वतंत्रपणे २.४९ एमएलडी शुद्ध पाणी टँकरद्वारे पुरवले जाते. या पार्श्वभूमीवर या गावांसाठी स्वतंत्र शुद्ध पाणीपुरवठा योजना विकसित करण्यात आली आहे.
प्रायमूव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंट्स प्रा. लि. यांनी तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार या योजनेचा अंदाजित खर्च ८९० कोटी रुपये आहे. प्रकल्पांतर्गत खडकवासला धरणातून पाणी घेण्यासाठी जॅकवेल व पंपगृह उभारणे, प्रत्येकी १०० एमएलडी क्षमतेची दोन जलशुद्धीकरण केंद्रे उभारणे, मुख्य जलवाहिन्या व वितरण जाळे विकसित करणे, साठवण टाक्या बांधणे तसेच एससीएडीए ऑटोमेशन यंत्रणा उभारण्याचा समावेश आहे.
या प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करण्याबाबत इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी) यांच्याशी महापालिकेची चर्चा सुरू आहे. आयएफसीने निधी उपलब्ध करून देण्याची प्राथमिक तयारी दर्शविली असून त्यासाठी पर्यावरण व सामाजिक परिणाम मूल्यांकन (ईएसआयए) अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे या अहवालासाठी होणारा खर्चही आयएफसीच्या ‘एमयूडब्ल्यूआरईपी’ कार्यक्रमातून परत मिळणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
सल्लागार निवडीसाठी क्यूसीबीएस (गुणवत्ता आणि खर्च आधारित निवड) पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामध्ये पाच पात्र निविदा प्राप्त झाल्या. तांत्रिक मूल्यांकन आणि आर्थिक निकषांनुसार डिलॉईट टच तोहमात्सू इंडिया एलएलपी यांची ३६ लाख ३२ हजार ७४० रुपयांची निविदा सर्वाधिक गुणांसह पात्र ठरली. निविदा समिती आणि मुख्य अभियंत्यांनीही या निवडीस मान्यता दिली आहे.



























